बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील नरसाळा गावात किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गावातील एका 30 वर्षीय युवकाला आरोपीने विनाकारण शिवीगाळ करून चक्क काखेत चावा घेतला व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाने पोलीस स्टेशन मारेगाव येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार विवेक पांडुरंग देवाळकर वय 30 हा नरसाळा येथील रहिवासी असून तो मजुरी काम करतो. रविवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास तो गावातील वॉटर फिल्टर जवळ बसलेला होता. दरम्यान तिथे आरोपी राजू बाजीराव सुरपाम वय 33 हा आला. त्याने अचानक विवेकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने युवकाचा गळा पकडून उजव्या हातावर ठोसा मारला, तसेच एवढ्यावरच न थांबता त्याने विवेकच्या डाव्या काखेत चावा घेतला व जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडिताने आपल्या भावासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 296, 351(2) व 351(3) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.


Comments are closed.