दीपक चौपाटी ते जंगली पीर रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
वाहतुकीचा काही काळ खोळंबा... 15 दिवसात रस्त्याच्या कामाचे आश्वासन
विवेक तोटेवार, वणी: दीपक चौपाटी ते जंगली पीर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दादाजी पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत नगर परिषदेकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. अखेर उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी आंदोलकांची भेट घेतली व रस्त्याच्या कामाचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
दीपक चौपाटी ते जंगली पीर हा लालगुडा, वागदरा, शिरपूर, घुग्घुस, कोरपना इत्यादी मार्गासाठी शॉर्टकट म्हणून वापरला जातो. विशेष म्हणजे दुचाकी वाहतुकीची संख्या या मार्गावर अधिक आहे. मात्र सदर मार्ग शॉर्टकट असल्याने अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अनेक दुचाकीचे अपघात या मार्गावर होतात. गेल्या 3 वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आरटीआय कार्यकर्ते दादाजी पोटे यांनी याआधी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, वाहतूक विभाग यांना अनेक वेळा निवेदन दिले होते. मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे शेवटी नागरिकांसह रस्ता रोकोचा मार्ग अवलंबला. आंदोलकांनी आमदार निधीतून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. तसेच या रस्त्यावरून जड वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनाच्या दरम्यान पोलिस आणि वाहतूक विभागाची उपस्थिती होती. उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली आणि 15 दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.



Comments are closed.