बहुगुणी डेस्क, वणी: देशमुखवाडी परिसरात मध्यरात्री गस्त घालताना पोलीस पथकाने एका संशयास्पद तरुणाला पकडले. हा तरुण अंधाराचा फायदा घेऊन लपून बसून होता. पोलिसांची गाडी पाहताच त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. चोरीच्या उद्देशाने हा सदर ठिकाणी लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मंगळवार, दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 12.30 वाजता पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर हे सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. दरम्यान, दुमोरे दवाखान्याजवळील काशीनाथ मेडिकलच्या बाजूला एक तरुण संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पथकाने शिताफीने त्याला पकडले.
चौकशीत त्याने आपले नाव शेख समीर शेख साबीर पठाण (वय 20, रा. रंगनाथनगर, खरबडा मोहल्ला, वणी) असे सांगितले. त्याच्याकडून रात्री अंधारात थांबण्याचे कोणतेही समाधानकारक कारण समोर आले नाही. उलट तो पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा तरुण संपत्तीविषयक चोरीच्या उद्देशाने लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंचनामा करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी त्याच्याविरुद्ध बीएनएस कलम 122 व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





Comments are closed.