बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील भालर वसाहतीत जबरी घरफोडी झाली असून, यात अज्ञात चोरट्यांनी 2 लाखांच्या दागिन्यांसह 50 हजारांची रोकड लंपास केली. सदर घटना ही बुधवारी मध्यरात्री घडली. घरातील कुटुंबीय मयतीसाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. भालर वसाहतीत सातत्याने घरफोडी होत असल्याने या वसाहतीतील रहिवासी दहशतीत आले आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी नलिनी शशिकांत ढाक (वय 38) या भालर वसाहतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या सास-यांवर नागपूर येथे उपचार सुरु होता. त्यामुळे मंगळवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी त्या पतीसह नागपूर येथे गेल्या. दरम्यान घरी त्यांची सासू, मुलगा व मुलगी होते. उपचारादरम्यान त्यांच्या सास-याचे निधन झाले. धानोरा जि. चंद्रपूर येथे दुस-या दिवशी (बुधवारी) अंत्यविधी होता. त्यामुळे घरी असलेल्या सासू व मुलगा-मुलगी हे धानोरा येथे अंत्यसंस्कारासाठी गेले.
बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रात्री मध्यरात्री चोरटे दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात शिरले. त्यांनी कपाटातील सोन्या–चांदीचे दागिने व रोकड चोरली. 2.03 लाखांचे सोन्याचे दागिने, 2 हजारांची चांदीची चैन व 50 हजार रुपये रोकड असा एकूण 2.53 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरफोडी केल्यानंतर चोरटे पळून जात होते. मात्र दरम्यान सेक्युरिटी गार्डला चोरटे पळताना दिसले. त्यामुळे चोरीची घटना उघडकीस आली.
रात्री 1.30 वाजताच्या सुमारास ढाक यांच्या शेजा-यांनी ढाक कुटुंबीयांना त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. ढाक कुटुंबीय तातडीने भालर येथे घरी पोहोचले. त्यांना घरातील सामान अस्तव्यस्त व कपाटाचे लॉकर तुटलेले आढळले. तसेच रोकड व दागिने असा सुमारे 2.5 लाखांचा ऐवज लंपास झाल्याचे आढळले. गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी नलिनी ढाक यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलमबीएनएसच्या कलम 305(a) आणि 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.





Comments are closed.