बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील घोन्सा येथे रस्ता बांधकामावरून मनसे नेते राजू उंबरकर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात वाद झाला. या वादातून राजू उंबरकर व त्यांच्या सहका-यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घोन्सा जवळील एका जिनिंग जवळ हा वाद झाला. या प्रकरणी उंबरकर आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी राजू उंबरकर हे त्यांच्या दोन कार्यकर्त्यांसह घोन्सा येथे रस्त्याचे बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बांधकामाच्या साईटवर प्रोजेक्ट मॅनेजर अजय सुदामजी हिंगाणे (रा. बाबूपेठ, चंद्रपूर) कामाची पाहणी करत होते. यावेळी राजू उंबरकर आणि त्यांचे कार्यकर्ते तिथे कारने पोहोचले. उंबरकर यांनी रस्त्याचे काम कशा पद्धतीने होत आहे यावर चर्चा केली. दरम्यान एक कामगार निरपेंद्र पटेल याने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. यावरून वाद पेटला आणि उंबरकर यांनी पटेल तसेच हिंगाणे यांना थप्पड मारल्याचा आरोप आहे.
तसेच इतर कामगारांनाही मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करत ठेकेदाराला बोलवण्याची धमकी दिली. ठेकेदार अनुपस्थित असल्याचे सांगितल्यावर आरोपीने “मालकाला पाठवा नाहीतर प्लॉट जाळून टाकीन” अशी धमकी दिली. असा आरोप करीत प्रोजक्ट मॅनेजर अजय हिंगाणे यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 (2), 127 (2), 352, 351 (3), 329 (3), 191 (2), 189 (2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करत आहेत. या घटनेमुळे वणी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.





Comments are closed.