मजुरीचे रोखले पैसे, एका तरुणाचा दुस-या तरुणावर हल्ला

वनोजादेवी येथील घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: मजुरीच्या वादातून एका तरुणाला आधी डोक्यावर कड्याने वार करून जखमी केले, तर नंतर त्याच्या घरात घुसून त्याला व वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. वनोजादेवी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोन भावंडांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी अभिजीत दिनेश नगराळे (वय 20 ) हा वनोजादेवी येथील रहिवासी असून तो मारेगाव येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. गावातच आरोपी साहिल सुखदेव काळे (21) राहतो. हे दोघेही मारेगावातील एका कॅटरिंगमध्ये काम करतात. गावातीलच असल्याने त्यांची मैत्री होती. 20 सप्टेंबर रोजी या दोघांनी कॅटरिंगचे काम केले होते. या दोघांचेही पैसे कॅटरिंग मालकाने साहिलजवळ दिले होते. मात्र वारंवार पैसे माहितल्यावरही साहिल है पैसे अभिजीतता देत नव्हता. त्यातून या दोघांमध्ये वाद सुरु होता. एकदा साहिलने अभिजीतला या वादातून झापड मारली होती.

शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अभिजीत गावातील पंचशील चौकातील एका पानटपरीवर होता. तिथे साहीलने मागून येऊ अभिजितवर अचानक हल्ला चढवला आणि हातातील कड्याने त्याच्या डोक्यावर जोरदार मारला. यात अभिजितला गंभीर जखम झाली. त्याच अवस्थेत तो घरी परतला असता, साहिलचा भाऊ राकेश काळे (वय 27) घराच्या अंगणात घुसला आणि अभिजितसह त्याच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. “पुन्हा असा प्रकार केलास तर जिवे मारून टाकीन,” अशी जीवघेणी धमकी देत तो निघून गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गावकऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी करून वाद मिटवला, अभिजितने झालेल्या मारहाणीची तक्रार मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरून व मेडिकल सर्टिफिकिटवरून आरोपी साहील काळे आणि राकेश काळे या भावंडांविरुद्ध बीएनएसच्या कलम 118(1), 351(2)(3), 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

दिवाळी निमित्त ‘वणी बहुगुणी’वर करा आपल्या व्यवसायाची जाहिरात

Comments are closed.