नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सध्या ‘ही’ नावं चर्चेत !

एका दिवसात अनेक आजी-माजी कार्यकर्त्या ऍक्टिव्ह, पतीही लागले कामाला...

निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे आता वणीत महिला राज व त्यातही अनुसूचित जमातीतील महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापितांचा नगराध्यक्ष होण्याचा मनसुबा मनसुबाच राहिला. वणीत पहिल्यांदाच एसटी समाजातील महिलेला थेट नगराध्यक्ष पद मिळणार असल्याने हे वणीसाठी इतिहासातील एक नवे पान ठरणार आहे. मात्र अनेक पक्षांकडे उमेदवारच नसल्याने आता त्यांचा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. यात काही नावं शहरात चांगलेच चर्चीले जात आहे. याचाच आढावा या लेखात आपण घेणार आहोत. 

चळवळीतील महिलांना संधी
आरक्षणाच्या घोषणेनं, वर्षानुवर्षे सामाजिक चळवळीच्या छायेत राहिलेल्या महिलांच्या हृदयात आशेचा एक नवा किरण जागवला आहे. सामाजिक चळवळीत अनेक तरुण तसेच ज्येष्ट महिला कार्यरत आहेत. आजपर्यंत प्रस्थापितांच्या राजकारणात त्या डावलेल्या गेल्या. त्यांना राजकारणात नेतृत्व म्हणून पुढे येण्याची संधी मिळाली नाही. त्यांचे नेतृत्त्व हे केवळ सामाजिक चळवळीपुरते मर्यादीत राहिले. मात्र थेट नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाल्याने आजवर फक्त चळवळीत झळकलेले आवाज आता सत्तेच्या पायरीवर येण्यास सज्ज झाले आहेत. 

एका दिवसात अनेक आजी-माजी कार्यकर्त्या ऍक्टिव्ह
सोडत जाहीर झाल्याची वार्ता संपूर्ण वणीत पसरताच सर्व आजी-माजी कार्यकर्त्या ऍक्टिव्ह झाल्या आहेत. यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्या या काळाच्या ओघात मेनस्ट्रीम पासून तुटल्या होत्या. मात्र सोडतीमुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. यासह चळवळीत काम करणा-या तरुण महिलांचेही नाव या संदर्भात पुढे येत आहे. तर राजकारणात, समाजकारणात, पत्रकारिता इ. क्षेत्रात कार्यरत असलेल्या पतीच्या पत्नीच्या नावाची देखील चर्चा होत आहे. यासाठी पतीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सध्या  कुणाचे नाव चर्चेत ?
सध्या काही नावे वणीत चांगलेच चर्चीले जात आहे. काही वर्षांपूर्वी नगरसेविका असलेल्या एका महिला उमेदवारांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी त्या पद्धतीने हालचाली सुरु केल्याचे देखील बोलले जात आहे. त्यांचा नगरपालिकेचा अभ्यास, चळवळीतील अनुभव, ज्येष्ठता, वर्कृत्त्वशैली या गोष्टी त्यांचे बलस्थान मानले जात आहे. विशेष म्हणजे आरक्षण जर एसटी राखीव आल्यास नाव मागे पडायला नको म्हणून त्या आधीपासूनच तयारीला लागल्या होत्या. यासह आणखी एका माजी नगरसेविकेचे नाव देखील चर्चेत आहे. 

यातील पुढले नाव हे आदिवासी चळवळीतील आहे. सदर महिला या काही वर्षाआधी सामाजिक, आदिवासी, बहुजन चळवळीत अग्रेसह होत्या. त्या निवडणुकीच्या काळात एखाद्या पक्षाच्या प्रचारात देखील उपस्थित राहायच्या. मात्र काळाच्या ओघात सामाजिक, राजकीय चळवळीतून त्यांचे नाव लोप होत गेले. मात्र राखीव जागेच्या अनुशंगाने त्यांचे देखील नाव पुढे येत आहे.

तरुण चेह-यामध्ये आदिवासी चळवळीत काम करणा-या एका तरुणीचे नाव देखील चर्चीले जात आहे. सदर तरुणीही विविध सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असते. सोशल मीडियातही ती ऍक्टिव्ह असते. या नावांसह सामाजिक चळवळीत असलेल्या आणखी काही तरुणींचे नाव पुढील काळात समोर येऊ शकते.

एका उच्चशिक्षित डॉक्टरांची चर्चा
सध्या एका महिला डॉक्टरांचे नाव वणीकरांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. स्वच्छ प्रतिमा, उच्चशिक्षित, डॉक्टर म्हणून शहरात सुपरिचीत असलेली ही व्यक्ती सामाजिक चळवळीत देखील सहभागी असतात. विविध सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम, महिला सक्षमीकरण इत्यादी उपक्रमातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. यामुळे हे एक प्रभावी नाव मानले जात आहे. विशेष म्हणजे त्या जरी राजकारणापासून दूर असल्या, तरी त्यांच्या घरी राजकीय वातावरण आहे. त्यामुळे हा एक चांगला व सर्वसमावेशक पर्याय होऊ शकतो, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

सर्वच पक्षाची उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता
उमेदवारांचा पर्याय हा मोजका असल्याने सध्यातरी कुठलाही पक्ष आपले पत्ते ओपन करताना दिसत नाही. आपला उमेदवार दुस-या पक्षाने पळवू नये, म्हणून उमेदवाराच्या चाचपणी बाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. काही पक्षाने तर प्लान ‘बी’वर देखील काम सुरु केले आहे. प्लान ‘बी’ म्हणून शहरातील काही उच्चशिक्षित नावाबाबत चाचपणी सुरु झाली आहे. पक्षाला उमेदवार न मिळाल्यास किंवा ऐन वेळी उमेदवार पळवल्यास अचानक एखादे डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक किंवा उच्चशिक्षित उमेदवाराचे नाव धक्का म्हणून पुढे येऊ शकते. 

Comments are closed.