बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वाद वाढून मारहाण व जातीय शिविगाळ करण्यापर्यंत पोहोचला. एका खाजगी व्यवसायिकावर थापडबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मारेगाव येथील घोन्सा रोडवर रविवारी, 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8:25 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी बापलेकावर ऍट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केले आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सुनील उत्तमराव गेडाम (वय 45) हे मारेगाव येथील घोन्सा रोड येथील रहिवासी असून ते व्यवसायिक आहे. परिसरातच तुषार संजय पवार (वय अंदाजे 23) राहतो. रविवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सुनील आणि त्यांचा मित्र घरासमोर बोलत होते. दरम्यान तिथे आरोपी तुषार संजय पवार व त्याचे वडील संजय कन्हैया पवार (50) हे आले. त्यांच्यात वाद सुरू झाला.
सुनीलने त्यांना “तुम्ही महिला समोर चेंगट का करता?” असा सवाल केला असता, तुषारने त्याच्यावर थापडबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. या वेळी सुनीलच्या सोबत असलेल्या मित्राने मध्यस्थी करून वाद थांबवला. मात्र, या घटनेने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.
सुनीलने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपी तुषार संजय पवार आणि संजय कैन्हया पवार यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 च्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 115(2), 296, 3(5), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.





Comments are closed.