दुस-याच्या पत्नीवर आला दिल, पळवणा-याच्या बापाचा घेतला जीव

वणीत थरारक अपहरणानंतर खून; दुस-या दिवशी सापडला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यात घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली होती. सोमठाणा (जि. चंद्रपूर) येथील विनायक माधव कुडमेथे (वय अंदाजे 60) यांचे वणी येथून अपहरण केल्यानंतर त्यांचा खून केला. बेलोरा फाट्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौ. प्रिया विनोद तिरणकर (वय 27, रा. बोरगाव, ता. वणी, ह.मु. झरी, ता. झरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाने नितेश कुडमेथे याने एका परिचित व्यक्तीच्या पत्नीला चार महिन्यांपूर्वी पळवून नेल्यामुळे आरोपीने संतापातून त्यांच्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर प्रिया यांचे वडील विनायक कुडमेथे व आई माया कुडमेथे हे भीतीपोटी चिखलगाव येथे नातेवाईकांकडे राहत होते.

दिनांक 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विनायक कुडमेथे आपल्या नातवाला पियूष तिरणकर (वय 10) याला घेऊन किराणा सामान आणण्यासाठी वणी येथे गेले होते. सायंकाळी सुमारास पियूष हा रडतच घरी परतला. त्याने आईला सांगितले की, “यवतमाळ रोडवरील एका किराणा दुकानासमोर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आरोपी व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आले आणि आजोबांना शिवीगाळ करून मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.”

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेनंतर विनायक कुडमेथे यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी (6 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता कुडमेथे हे बेलोरा फाटा येथे मृत अवस्थेत आढळले. 

सदर घटनेनंतर वणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध BNS कलम 103, 140, 3(5) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पत्नीला पळवून नेल्याचा वचपा काढण्यातून सदर खून झाल्याचे समोर आले आहे. 

Comments are closed.