चिखलगावमधील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे ग्रामस्थ त्रस्त; कारवाईची मागणी

ग्रामपंचायत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  चिखलगाव येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक जागांवर झालेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध अतिक्रमणांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात एकत्र येऊन आवाज उठवला आहे. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वणी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते, पायवाटा आणि गटारांवर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि पादचारी मार्ग अरुंद झाल्याने वाहनांच्या रहदारीत अडथळे येत असून, अपघाताची भीती वाढली आहे. गटारे बंद झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा बाधित झाला असून, गावभर दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, आरोग्य समस्या उद्भवत आहेत. तसेच, सार्वजनिक जागांवर अवैध बांधकामे होत असल्याने शासकीय मालमत्तेचा गैरवापर सुरू आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, या समस्येबाबत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी तसेच लेखी तक्रारी आणि निवेदने दिली होती. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. “ग्रामसेवकांनी या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून, ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे,” असा थेट आरोप करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना नम्र विनंती केली आहे की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. यात चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून ती हटवण्याचे आदेश द्यावेत, ग्रामपंचायत प्रशासनास निर्देश द्यावेत आणि निष्क्रियतेसाठी ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करावी, असे सांगितले आहे.

या निवेदनावर चिखलगावच्या अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आणि नावांचा समावेश आहे. निवेदन देताना रोहन वरारकर, वसंता डवरे, मनोज नवले, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार, अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, क्रिष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे उपस्थित होते. गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका काय राहील आणि ग्रामस्थांना कधी दिलासा मिळेल, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Comments are closed.