पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणा-या 13 शिवसैनिकांना जामीन मंजुर झाला. त्यानिमित्त वणीत परतलेल्या सर्व शिवसैनिकांचे जल्लोषात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी आणि यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या वणी येथील शासकीय आढावा बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी ताफा अडवून काळी फीत दाखवली तसेच वाहनासमोर लोटांगण घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवसेनेच्या 13 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले.
यातील एका शिवसैनिकाला आधीच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर सर्व वणीचे इतर शिवसैनिकांच्या जामिनाकडे लक्ष लागले होते. 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने सर्व 12 पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर केला आणि 10 ऑक्टोबर रोजी त्यांची सुटका झाली. सुटका होताच आधी सर्व शिवसैनिकांचे यवतमाळ येथे व त्यानंतर वणीत परतल्यावर वणीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्यांमध्ये जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख संतोष कुचनकर, तसेच पुरुषोत्तम बुटे, गणपत लेडांगे, राजू तुराणकर, दिवाकर कोल्हेकर, मोहम्मद अन्सारी, भगवान मोहिते, मनिष बत्रा, जगन जुनगरी, संकेत मोहिते आणि प्रेमानंद धानोरकर यांचा समावेश होता. तर दिलीप काकडे या शिवसैनिकाला आधीच जामीन मंजूर झाला होता.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढताना अटक होण्याची पर्वा न करणाऱ्या या शिवसैनिकांचा आमदार संजय देरकर यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी वरोरा रोडवरील जनसंपर्क कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पेटून उठलेल्या शिवसैनिकांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून आंदोलनाने राज्यभरातही लक्ष वेधले आहे.





Comments are closed.