देशभक्तीच्या जल्लोषात वणी तिरंगामय; रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वणीत निघाली तिरंगा रॅली
पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. 13 ऑगस्ट) सकाळी विश्रामगृह येथून सुरू झालेल्या या रॅलीत 2,500 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, निवृत्त सैनिक तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. विश्रामगृह येथून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टिळक चौक येथे पोहोचली. रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते युवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या देशभक्तीपर उपक्रमात सहभागी झाले.
रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संस्था आणि व्यापाऱ्यांकडून सहभागी नागरिकांसाठी पाणी व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. जैन समाजाच्या श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी यांच्यासह विविध व्यापारी बांधवांनी सेवा दिली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत केले. रॅलीच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले. नगर परिषद वणीच्या सफाई कर्मचाऱ्यांनीही रॅलीच्या मार्गावर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली.
रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध मार्गक्रमण. रॅली पुढे जात असताना मागील भागात नगर परिषद कर्मचारी स्वच्छता करीत होते. त्यामुळे रॅलीनंतरही शहरातील मार्ग स्वच्छ ठेवण्यात आले. रॅलीची सांगता झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने विश्रामगृह येथे सहभागी नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण रॅलीदरम्यान नागरिकांनी तिरंग्याबद्दलचा अभिमान आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
या देशभक्तीपर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी शाळा-महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महसूल प्रशासन, पोलीस व वाहतूक पोलीस, पत्रकार तसेच सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानले.


Comments are closed.