आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेवर राजू उंबरकरांचा घणाघात
तीन चिमुकल्या प्रशासकीय निष्काळजीपणाचा बळी !
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गडचिरोली येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार घणाघात केला आहे. प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय निष्काळजीपणामुळेच निष्पाप मुलींना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आदिवासी विकास विभागाचा मोठा अर्थसंकल्प असतानाही आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप उंबरकर यांनी केला. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले.
सदर आश्रमशाळेतील तब्बल 79 मुलींना आजही जमिनीवर झोपावे लागत आहे. विद्यार्थिनींसाठी कॉट उपलब्ध करून देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोट्यवधींचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते; मात्र आदिवासी विद्यार्थिनींना झोपण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही मिळत नसतील, तर हा प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा असल्याची टीका त्यांनी केली.
‘मुलींच्या सुरक्षेशी तडजोड का?’
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका उंबरकर यांनी मांडली. या दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, तसेच बाधित अथवा जखमी विद्यार्थिनींना सर्वोत्तम आणि मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आहेत की नाहीत, मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची यंत्रणा किती सक्षम आहे, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे राजू उंबरकर यांनी म्हटले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे. गडचिरोलीतील या दुर्घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


Comments are closed.