आजपासून बळीराजा व्याख्यानमालेला सुरुवात, वैचारिक प्रबोधनाची मेजवानी
प्रख्यात विधिज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांचे दोन दिवसीय व्याख्यान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने यावर्षीही बळीराजा व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 11 व 12 ऑक्टोबर या दोन दिवसांत स्थानिक बाजोरिया लॉन येथे ही व्याख्यानमाला पार पडणार असून आज सायंकाळी 7 वाजता या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. या व्याख्यानमालेतून नागरिकांना वैचारिक प्रबोधनाची मेजवानी मिळणार आहे. सलग 11 वर्षे सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत दरवर्षी प्रख्यात विचारवंतांना आमंत्रित करून लोकांची ज्ञानपातळी उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी पुण्याचे संविधान विश्लेषक व विधिज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ते संविधान तज्ञ व सामाजिक न्याय विश्लेषक म्हणून ओळखले जातात.
पहिला दिवस – 11 ऑक्टोबर
सायंकाळी 7 वाजता ऍड. असिम सरोदे यांचे “संविधानाची प्रतिष्ठा आणि न्यायाचा प्रवास” या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर असतील.
प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मुख्याधिकारी सचिन गाडे, अंबादास वागदरकर, डॉ. सुनिल जुमनाके, डॉ. रमेश सपाट, नितीन पखाले, ऍड. परवेज पठाण, वंदना विधाते-धांडे, भारती राजपूत, गजानन चांदावार आदी मान्यवर उपस्थित राहतील.
दुसरा दिवस १२ ऑक्टोबर
दुसऱ्या दिवशी ऍड. असिम सरोदे “संविधानातील कर्तव्याची जाणीव आणि विवेकशीलता” या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही अनंत मांडवकर भूषवतील.
प्रमुख अतिथी म्हणून गणेश किंद्रे, सुरेश दळवी, प्रा. डॉ. सुनंदा आस्वले, ऍड. विरेंद्र महाजन, राजेंद्र देवडे, रोहिणी तायडे, राहुल मानकर, पांडुरंग लांजेवार, अजय धोबे, वैभव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
शिव महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रा. करमसिंग राजपूत व सर्व सदस्यांनी नागरिकांना या वैचारिक मेजवानीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



Comments are closed.