अतिक्रमणामुळे गावकऱ्यांचे जीवन विस्कळीत; आमदार संजय देरकर यांच्याकडे निवेदन

सार्वजनिक रस्ते, गटारे आणि शासकीय जागांवर अवैध बांधकामांचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील चिखलगाव (तालुका वणी, जिल्हा यवतमाळ) येथील ग्रामस्थांनी गावातील सार्वजनिक जागांवर झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध अतिक्रमणांविरोधात आवाज उठवला आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी थेट आमदार संजय देरकर (शिवसेना – उबाठा) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक मालमत्तेवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे गावातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून आरोग्य आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. रस्ते, पादचारी मार्ग आणि पायवाटांवर झालेल्या अवैध बांधकामांमुळे मार्ग अरुंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.

गटारांवर अतिक्रमण झाल्याने सांडपाण्याचा निचरा थांबला असून गावात घाणीचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेल्या जागांवर अवैधरित्या बांधकामे झाल्याने शासनाच्या मालमत्तेचा गैरवापर होत असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

ग्रामस्थांनी आमदार संजय देरकर यांना तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. त्यांनी संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निर्देश देऊन चिखलगाव हद्दीतील सर्व अतिक्रमणांचे तात्काळ सर्वेक्षण करून ती हटवण्याची मागणी केली आहे. तसेच या गंभीर विषयावर निष्क्रियता दाखवल्याबद्दल संबंधित ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मागणीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार देरकर यावर कोणती भूमिका घेतात आणि ग्रामस्थांना दिलासा कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते रोहन वरारकर, मनोज नवले, वसंता डवरे, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार, अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, क्रिष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे, गिरीश सातपुते आणि लखन ठावरी हे उपस्थित होते.

Comments are closed.