शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची निवडणूक तयारी सुरू
इच्छुकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
बहुगुणी डेस्क, वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक तयारीला सुरुवात केली असून, इच्छुक उमेदवारांसाठी अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वणी शहर कार्यकारिणीकडून यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना तिकिटासाठी इच्छुकांनी वणीतील वरोरा रस्त्यावरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयातून अर्ज प्राप्त करून, तो पूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कार्यालयात सादर करावा, असे आवाहन शहर प्रमुख विनोद दुमणे, संपर्क प्रमुख राजु तुरणकर, संघटक मनिष बत्रा, समन्वयक अयुब खान पठाण आणि सचिव अजय चन्ने यांनी केले आहे.
अर्जामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती, राजकीय अनुभव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य, आंदोलनातील सहभाग यांचा तपशील देणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराच्या समाजमाध्यमांवरील उपस्थितीची माहितीही मागवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत अनिवार्यपणे जोडावी लागणार आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व छायाचित्रे जोडणे बंधनकारक असून, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची छाननी पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार असून, अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल, असेही शहर कार्यकारिणीने स्पष्ट केले आहे.



Comments are closed.