दामले नगरमध्ये विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी कामावर गेल्यानंतर पतीने केली आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील दामले नगर परिसरात राहणाऱ्या संतोष रामचंद्र वाढई (वय 40) या युवकाने मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष वाढई हे रोजंदारीवर काम करणारे होते, तर त्यांची पत्नी देखील मजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती. दोघेही मेहनतीने कुटुंबाचा गाडा हाकत होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना संतोष यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नी कामावर गेल्यानंतर त्यांनी घराच्या आड्याला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तालुक्यात सातत्याने होणाऱ्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मानसिक खच्चीकरणातून घरातील कर्ते पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने सामाजिक पातळीवरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. संतोष याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा आप्त परीवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.