निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतायेत ? मग अर्ज तपासून घ्या

अर्ज बाद ठरू नये म्हणून मदत कक्षाची स्थापना

बहुगुणी डेस्क, वणी: नामनिर्देशन करण्याची ऑनलाईन प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे. तर 17 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची हार्डकॉपी सादर करावी लागणार आहे. दर निवडणुकीत अनेक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र त्रुटी किंवा चुकीच्या पद्धतीने भरल्याने अवैध ठरवले जाते. त्यामुळे अर्ज सबमीट करण्याआधी आता उमेदवारांना अर्ज तपासण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात याबाबत मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मदत कक्षाला लाभ घेण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया :
निवडणूक अर्ज 10 नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले आहे. तर  17 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत (सुटीचा दिवस वगळून) अर्जाची हार्डकॉपी स्वीकारली जाणार आहे. एकाच व्यक्तीने अनेक उमेदवारांचे सुचकत्व केल्यास पहिलाच फॉर्म ग्राह्य धरला जाईल. अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी Rs. 2000 तर राखीव उमेदवारांसाठी Rs. 1000 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करते वेळी फक्त उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व सुचकांनाच निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीकृत पक्ष उमेदवारासाठी एक सुचक, तर अपक्ष उमेदवारासाठी पाच सुचक असतील. सुचक त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे
नामनिर्देशनासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट, मालमत्ता-दायित्व व गुन्हेगारी संदर्भातील शपथपत्र, अपत्य संदर्भातील शपथपत्र, राजकीय पक्षाच्या उमेदवाराकरिता जोडपत्र एक व दोन, मतदार यादीची प्रमाणित प्रत, तसेच अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र (किंवा अर्जाची पोच) सादर करणे आवश्यक आहे.

Comments are closed.