मुकुटबनमध्ये सात दिवस पेटलेलं कामगारांचं आंदोलन अखेर यशस्वी
कामगार एकजुटीचा विजय: RCCPL कंपनीने सर्व मागण्या मान्य केल्या
बहुगुणी डेस्क, वणी झरी: जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) तर्फे RCCPL MP Birla Cement कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. सात दिवस चाललेल्या संघर्षानंतर चंद्रपूर येथे झालेल्या निर्णायक चर्चेत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. कंपनी प्रशासनाला असि. लेबर कमिश्नर यांनी स्पष्ट शब्दांत आदेश दिले. या विजयाने मुकुटबन शहरात “लाल झेंडा फडकला” आणि कामगारांच्या जयघोषांनी वातावरण दणाणून गेले.
मुकुटबन येथील कार्यरत RCCPL MP BIRLA सिमेंट कंपनीतील कामगारांच्या मागण्यांसाठी जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) तर्फे दि. 6 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू झाले होते. कामगार नेते कॉ. अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखाली सात दिवस सलग सुरु असलेल्या या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत होता.
या पार्श्वभूमीवर असि. लेबर कमिश्नर मा. प्रशांत सिंग यांनी बुधवारी, दि. 12 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे कंपनी प्रशासन व युनियन प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. बैठकीत कामगारांच्या मागण्या रास्त व कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने दाखविलेला आडमुठेपणा व मग्रुरपणा कमिश्नर यांनी धारेवर धरला आणि सर्व मागण्या मान्य करण्याचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे, कंपनीने युनियन अनधिकृत असल्याचा दावा केला होता. मात्र तपासणीअंती जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन ही राज्यव्यापी नोंदणीकृत असून आयटकशी संलग्न असल्याने मान्यताप्राप्त असल्याचे निष्पन्न झाले. तसेच युनियनला अध्यक्षपदी कंपनीबाहेरील व्यक्ती ठेवण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीला कॉ. अनिल हेपट यांच्याशी चर्चा करणे भाग पडले.
बैठकीत कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधी व युनियनकडून अध्यक्ष कॉ. अनिल हेपट, अनिल घाटे, पंढरी नांदेकर, प्रफुल्ल बद्रे, रोषण चामाटे, अक्षय पुल्लेवार, महादेव मेश्राम, उमाकांत मोहीतकर, राजु वरहाटे, विश्वनाथ साहु व निखील जुमनाके उपस्थित होते. कंपनीने सर्व मागण्या मान्य केल्याने सात दिवस चाललेले आंदोलन संपुष्टात आले. यानंतर मुकुटबन शहरात कामगारांनी विजयाचा जल्लोष केला. “कामगार एकजुटीचा विजय असो”, “आयटक युनियन जिंदाबाद”, “कॉ. अनिल हेपट आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “लाल झेंडा जिंदाबाद” अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. ढोल-ताशांच्या गजरात कामगारांनी आपल्या आंदोलनाचा विजयी समारोप केला.



Comments are closed.