नामनिर्देशन अर्ज शनिवारी देखील भरता येणार, उमेदवारांना दिलासा

तर रविवारी देखील हेल्प डेस्क सुरु राहणार, उमेदवारांना तपासता येणार अर्ज

बहुगुणी डेस्क, वणी: नामनिर्देशन करण्याची ऑनलाईन प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे. तर 17 नोव्हेंबर पर्यंत अर्जाची हार्डकॉपी सादर करावी लागणार आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळ पर्यंत एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे केवळ शुक्रवार व सोमवार हे दोनच दिवस नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उरले होते. एकाच वेळी उमेदवारांची होणारी गर्दी व कोणतेही अर्ज बाद ठरू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शनिवारी देखील इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. तर रविवारी देखील हेल्प डेस्क सुरु राहणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना त्यांचा अर्ज तपासता येणार आहे व त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी एक दिवस आणखी मिळणार आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया:
अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी Rs. 2000 तर राखीव उमेदवारांसाठी Rs. 1000 निश्चित करण्यात आली आहे. एकाच व्यक्तीने अनेक उमेदवारांचे सुचकत्व केल्यास पहिलाच फॉर्म ग्राह्य धरला जाईल. अर्ज दाखल करते वेळी फक्त उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व सुचकांनाच निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीकृत पक्ष उमेदवारासाठी एक सुचक, तर अपक्ष उमेदवारासाठी पाच सुचक असतील. सुचक त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे
नामनिर्देशनासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट, मालमत्ता-दायित्व व गुन्हेगारी संदर्भातील शपथपत्र, अपत्य संदर्भातील शपथपत्र, राजकीय पक्षाच्या उमेदवाराकरिता जोडपत्र एक व दोन, मतदार यादीची प्रमाणित प्रत, तसेच अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र (किंवा अर्जाची पोच) सादर करणे आवश्यक आहे.

Comments are closed.