कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर रॉडने जीवघेणा हल्ला
मुलाच्या ताब्यावरून झाला वाद, पतीविरोधात गुन्हा दाखल
बहुगुणी डेस्क, वणी: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात पत्नीच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. गुरुवारी संध्याकाळी गोकुळनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरू वणी पोलीसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, पूजा सुनिल वाईकर (वय 22) या वणीतील गोकुळ नगर येथील रहिवासी आहे. त्यांचे पती सुनिल पंजाबराव वाईकर (वय 26) यांच्याशी 2021 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा आहे. पती-पत्नीमध्ये वाद असल्याने पूजा वाईकर काही काळापासून आई-वडिलांसोबत राहतात. तर मुलगा देखील त्यांच्याच सोबत असतो.
दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी पूजा या सकाळी मजुरीसाठी गेल्या. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलाला बहिणीकडे सोपवले होते. संध्याकाळी परतल्यावर मुलाला आणण्यासाठी त्या गेल्या. मात्र त्यांना कळले की पती सुनिल वाईकर मुलाला घेऊन गेले आहेत. मुलाला परत आणण्यासाठी पूजा वाईकर पतीकडे गेल्या असता त्यांनी मुलगा देण्यास नकार दिला.
त्यानंतर त्यांनी घरात जाऊन मुलाला घेण्याचा प्रयत्न करताच आरोपीने पत्नीचे केस ओढून लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. यात पूजा वाईकर गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना वडिलांनी तातडीने वणी पोलीस स्टेशनमध्ये आणले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी सुनिल वाईकर याच्यावर बीएनएसच्या कलम 118 (1) व 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.



Comments are closed.