वणीत जल्लोषात निघाली महाविकास आघाडीची शक्तीप्रदर्शन रॅली

वणीकर परिवर्तन घडवतील, महाविकास आघाडीचा विश्वास

बहुगुणी डेस्क, वणी: आज नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्वच इच्छुकांनी आपला अर्ज सादर केला. अखेरचा दिवस महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा ठरला. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी वाजत गाजत रॅली काढून नामनिर्देशन अर्ज सादर केले. या रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले. शिवसेना (उबाठा) तर्फे डॉ . संचिता विजय नगराळे (गेडाम) यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे फॉर्म भरला. तर महाविकास आघाडीतील पक्षाच्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र सादर केले. 

रंगनाथ स्वामी यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन रॅलीला दु. 1.30 वाजता रंगनाथ स्वामी मंदिरातून सुरुवात झाली. त्यानंतर रॅली वाजत गाजत गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक असे मार्गक्रमण केले. रॅलीची तहसिल कार्यालयाजवळ सांगता झाली. त्यानंतर सर्व उमेदवारांनी निमनिर्देशन पत्र निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर केले. रॅलीत महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते. यात शिवसेना उबाठा, काँग्रेस, मनसे, संभाजी ब्रिगेड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिका-यांचा समावेश होता.

या रॅलीत आ. संजय देरकर, संजय निखाडे, योगिता मोहळ, किरण देरकर, डिमन टोंगे, दीपक कोकास, शरद ठाकरे, अजिंक्य शेंडे, संतोष कूचनकार, सुरेखा ढेंगळे तर मनसेतर्फे नेते राजू उंबरकर, फाल्गुन गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसतर्फे संजय खाडे, वंदना आवारी, डॉ. महेंद्र लोढा, राजू कासावार, राजू येल्टीवार, विकेश पानघाटे, घनश्याम पावडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नगरपालिकेत होणार परिवर्तन
या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार वणीकरांनी आजच्या रॅलीत स्पष्टपणे दाखवून दिला आहे. येणारी नगरपालिका वणीकरांच्या आशा-अपेक्षांना न्याय देणारी आणि खऱ्या अर्थाने बदल घडवणारी ठरेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अशी प्रतिक्रिया आमदार संजय देरकर यांनी दिली. तर वणीकरांनी परिवर्तनाची दिशा ठरवली आहे. नगरपालिकेत विकास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी दिली.

रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांनी सहभाग घेतला. शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसे, संभाजी ब्रिगेड अशी यावेळी जम्बो युती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उत्साह शिगेला आहे. रॅलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, बुथ प्रमुख व विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.