बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरीतील तरुणीच्या संसाराला सुरुवातीला सुखाचे दिवस लाभले, मात्र काही महिन्यांतच तिच्या आयुष्याला वाद, मारहाण आणि पैशाच्या मागणीने ग्रासले. त्यातच पतीच्या मोबाईलवर महिलांचे कॉल यायचे. अखेर छळाला कंटाळून तिने माहेरी परत येत पोलिसांकडे धाव घेतली. वणी पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, पायल (नाव बदललेले वय 26) या मुळच्या राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. यांचे दोन वर्षांआधी घुग्घुस येथील एका तरुणाशी (वय 34) लग्न जुळले. त्यानंतर समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे वणी येथे त्यांचे लग्न झाले. लग्नावेळी वडिलांनी अंगठी, तोड्याचा गोप व संपूर्ण खर्च केला होता.
लग्नानंतर काही महिने संसार सुरळीत चालला, मात्र लग्नाच्या दोन तीन महिन्यातच पती व सासरकडील लोकांनी किरकोळ कारणावरून वाद घालत होते. त्यानंतर पतीच्या मोबाईलवर महिलांचे फोन येत असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. मात्र विचारणा केल्याने पतीने पायलला मारहाण केली. पुढे पतीने ट्रक घेण्यासाठी माहेरकडून दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्यास घरात ठेवणार नाही अशी धमकी दिली.
या प्रकरणी सासू (वय 55), आजी सासू (वय 69) व काका (वय 48) यांनीही पतीला प्रोत्साहन देऊन पैशाची मागणी करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या छळामुळे अखेर पायल हि मे 2025 मध्ये माहेरी परत आली. त्यानंतर त्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती. हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा येथे गेले, मात्र तोडगा निघाला नाही.
महिला समुपदेशन केंद्राने पुढील कारवाईसाठी अहवाल दिल्यानंतर वणी पोलीसांनी पती, सासू, आजीसासू व काका अशा चौघांवर BNS कलम 3(5), 351(2), 351(3), 85 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.



Comments are closed.