विठ्ठलवाडी येथे शिवसेना उबाठाची भव्य कॉर्नर सभा व रॅली ठरली लक्षवेधी
प्रणाली गणेश देऊळकर व अजय धोबे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांच्या प्रचारार्थ दौरा...
बहुगुणी डेस्क, वणी: विकास हाच आमचा अजेंडा आणि जनसेवा हाच आमचा धर्म आहे. वणीला आदर्श नगरपालिका बनवण्याचा शब्द आम्ही देतोय. यासाठी शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकजुटीने साथ द्या,” असे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले. शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) प्रभाग 1 मधील उमेदवार प्रणाली गणेश देऊळकर व अजय धोबे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांच्या प्रचारार्थ विठ्ठलवाडी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
विठठ्लाडी येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. गजानन महाराज मंदिर, अग्रसेन नगर, पानघाटे ले-आऊट, वडगाव रोड व प्रभागातील गृहभेटी घेत रॅली निघाली. गजानन मंदिर येथे उमेदवारांनी दर्शन घेतले. रॅलीत कार्यकर्त्यांच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते. महिलांचा व युवकांचा जोरदार सहभाग पाहता, प्रत्येक चेहऱ्यावर विजयाची चमक उमटली होती. रॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले वाचनालयाजवळ झाला.
काँर्नर सभेत आमदार देरकर म्हणाले की डॉ. संचिता नगराळे या उच्चशिक्षित असून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. प्रणाली देऊळकर या लढाऊ वृत्तीच्या कार्यकर्त्या आहेत. अजय धोबे हे विद्यार्थी व बहुजनवादी चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते सतत लोकांचे प्रश्न मांडतात. जनतेच्या प्रश्नांना रस्त्यावर उतरून लढणारे कार्यकर्ते आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अशा लढाऊ व चळवळीतील कार्यकर्त्यांना यावेळी पालिकेत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.

यावेळी काँग्रेसचे संजय खाडे म्हणाले, “आमच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ सत्तेची स्पर्धा नाही, तर जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक न्याय या सर्वच क्षेत्रांत काँग्रेसने सातत्याने काम केले आहे. या निवडणुकीतही आम्ही याच मुद्यावर ठाम राहू.” डॉ. संचिता नगराळे यांनी जनतेच्या जीवनमानात बदल घडवण्याची जबाबदारी स्वीकारत शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडली.

रॅलीत अखिल सातोकर, राजू तुराणकर यांच्यासह शिवसेना (उबाठा), काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते-पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युवक व महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.



Comments are closed.