प्रभाग 9 मध्ये शिवसेना (उबाठा) चा जोरदार प्रचार

संबोधी बुद्धविहारात झाली कॉर्नर सभा, मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे नगराध्यक्षश्र पदाचे उमेदवार डॉ. संचिता विजय नगराळे व नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. किरण शंकर देरकर आणि शत्रुघ्न मारोती मालेकर यांच्या प्रचारार्थ रॅली झाली. या रॅलीला आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रॅलीने प्रभाग पिंजून काढत मतदारांची भेट घेतली. तसेच संबोधी बुद्ध विहारात कॉर्नर सभा घेण्यात आली. रॅली व कॉर्नर सभेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

बुद्ध विहारात झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना आमदार संजय देरकर यांनी मुलांसाठी बगीचा, खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, तसेच सार्वजनिक सोयींमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. मतदारांच्या कोणत्याही समस्येला तत्काळ धावून जाण्याचे व त्यांचे निराकरण करण्याचे वचन देखील त्यांनी दिले. तर डॉ. संचिता नगराळे यांनी नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे वचन दिले. तसेच या भागातील नवीन वस्तीत अद्याप मुलभूत सोयी सुविधा नाही. या वस्तीत पथदिवे, रस्ते तसेच पाईपलाईनची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देखील दिले. सभेच्या आधी उपस्थितांनी डॉ. संचिता नगराळे व उमेदवारांचे हार टाकून स्वागत केले.

विश्वास प्रभाग 9 अ मधील उमेदवार सौ. किरण शंकर देरकर सामाजिक, धार्मिक आणि जनकल्याणकारी कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे महिलांपासून युवकांपर्यंत उत्साही प्रतिसाद मिळत आहे. पती शंकर देरकर यांचे अखंड सहकार्य व सातत्यपूर्ण समाजकार्यामुळे त्यांचा जनसंपर्क अधिक भक्कम झाला आहे. नागरिकांच्या आग्रहामुळेच त्या या वेळेस नगरसेवकपदासाठी उभ्या राहिल्या आहेत. शत्रुघ्न मालेकर हे जनतेत मिसळणारा युवा चेहरा आहे. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची त्यांची शैली प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. अनेक वर्षांपासून ते समाजसेवा करत असून युवकवर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गल्लीबोळांत उत्साहाचे वातावरण जैन ले-आऊट, हनुमान मंदिर परिसर, तसेच इतर वॉर्डांमध्ये दररोज मालेकर आणि देरकर यांच्या प्रचारामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. जनसंपर्क दौऱ्यांत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून शिवसेना (उबाठा) गटावरील जनतेचा विश्वास दृढ होत आहे. प्रचार रॅलीला व कॉर्नर सभेला  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.