प्रभाग 9 मध्ये शिवसेनेची (उबाठा) भव्य रॅलीने वेधले मतदारांचे लक्ष

किरण देरकर व शत्रुघ्न मालेकर यांच्या रॅली व सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 1 डिसेंबर रोजी शिवसेना (उबाठा) गटाची प्रभाग 9 मध्ये भव्य रॅली काढण्यात आली. प्रभाग 9 मधील नागरिकांनी उमेदवार किरण देरकर, शत्रुघ्न मालेकर व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीला प्रभागातील मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. सुमारे अर्धा ते पाऊन किलोमीटरची रॅलीची रांग होती. जैन ले-आऊट येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर रॅली काळे ले आऊट, पद्मावती नगरी, हिराणी ले आऊट, साई नगरी, आशियाना हॉल परिसर, मोमीनपुरा असा विस्तृत मार्गक्रमण करत रॅलीची सांगता पुन्हा जैन ले-आऊटमधील हनुमान मंदिरात झाली. वाजत गातज निघालेल्या या रॅलीने मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. या रॅलीत आमदार संजय देरकर, राजूभाऊ उंबरकर, संजय निखाडे, इरशाद खान, सुनील कातकडे, नानू त्रिंबके, ईश्वर खाडे, संतोष कुचनकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  तर रविवारी रात्री जैन ले आऊट येथे भव्य कॉर्नर सभा घेण्यात आली. 

जैन ले-आऊट येथे संध्याकाळी 7 वाजता शिवसेना उबाठा गटाची कॉर्नर सभा उत्साहात पार पडली. दुर्गा माता मंदिराजवळ झालेल्या या सभेला महिलांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य प्रतिसाद दिला. सभेच्या सुरुवातीला नागरिकांनी आमदार संजय देरकर यांच्यासमोर आपल्या प्रमुख समस्या मांडल्या. 

दुर्गा माता मंदिराला शेडची आवश्यकता, पाणीपुरवठा पाच–सहा दिवसातून एकदाच होत असल्याने निर्माण होणारी पाणीटंचाई, भूमिगत नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहणे व दुर्गंधी अशा तातडीच्या प्रश्नांवर उपाययोजना करून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार देरकर यांनी दिले. विकासकामांसाठी मतदारांनी शिवसेनेसोबत एकदिलाने उभे राहावे,” अशी विनंती त्यांनी जनतेला केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संचिताताई नगराळे यांनी शहरातील वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. “प्रदूषणामुळे श्वसन व त्वचारोगांची संख्या वाढली आहे. सत्ता मिळाल्यानंतर वणीतील प्रदूषण समस्या प्राधान्याने सोडवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारांनी उमेदवार किरण देरकर व शत्रुघ्न मालेकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. महिलांनीही घरातील कामे आटोपून सभेला उपस्थित राहून आपली साथ दाखवली. उमेदवारांनी “जैन ले-आऊटमधील पाणीपुरवठा व नाल्यांची समस्या लवकरात लवकर सोडवू. शिवसेनेने आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही प्रामाणिकपणे पेलू,” असे आश्वासन दोन्ही उमेदवारांनी दिले. 

प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी उमेदवार किरण देरकर आणि शत्रुघ्न मालेकर यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा पुरावा ठरला. सभेत उपस्थित महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनीच या दोन्ही उमेदवारांवर विश्वास दाखवला. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार, विकासकामांना गती देण्याची तयारी आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याची हमी यामुळे किरण देरकर व शत्रुघ्न मालेकर हे प्रभाग 9 च्या मतदारांसाठी आशेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Comments are closed.