ट्रिपल इंजिन सरकार : भाजपने मांडली वणीच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट
‘पार्लमेंट ते पंचायत’ : भाजपची विकासाची नवी दिशा... !
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडले आहे. ‘पार्लमेंट ते पंचायत’ या तत्त्वावर आधारित ही विकासाची ब्लू प्रिंटच आहे. ज्यात केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर एकाच पक्षाचे शासन असल्याने निर्णयप्रक्रिया वेगवान होईल आणि विकासाला खरी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. वणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम व नगरसेवक पदाचे सर्व 29 उमेदवार यांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याचे आर्जव करताना हे व्हिजन मांडण्यात आले आहे. मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पक्षाने विविध वचन मतदारांना दिले आहे.
‘पार्लमेंट ते पंचायत’ एकविचाराचं शासन म्हणजे वेगवान विकास
विकासाचा पाया मजबूत नेतृत्व आणि एकविचाराचं शासन यातच दडलेला आहे, असा संदेश भाजपने दिला आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकाच पक्षाचं सरकार असेल, तर निर्णयप्रक्रिया वेगवान होते, निधी सहज उपलब्ध होतो आणि योजनांना राजकीय अडथळे येत नाहीत, असा भाजपनेन स्पष्ट केले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशभरात पायाभूत सुविधांचा कायापालट घडवून आणला. राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, डिजिटल क्रांती अशा योजनांमुळे ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकार होत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात भाजप-महायुती सरकार असल्याने केंद्र आणि राज्याची समान विकासनीती प्रकल्पांना गती देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दीर्घकालीन योजनांना निधी विलंब न होता मिळत असून, राज्य प्रगतिपथावर वेगाने पुढे जात आहे. वणी शहरात संजीवरेड्डी बोदकुरवार आणि तारेंद्र बोर्डे यांसारखे लोकाभिमुख नेतृत्व मिळाल्याने गेल्या काही वर्षांत अनेक कामे पूर्ण झाली. ही कामे नेतृत्व, निधी आणि दृष्टी यांचं त्रिकूट जुळल्यामुळे शक्य झाली, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

भाजप म्हणजे विकासाला गती, स्थिरता आणि पारदर्शक सुशासन. त्यामुळेच पुन्हा ‘कमळ’ हाच पर्याय निवडावा, असा पक्षाचा संदेश आहे. वणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम व नगरसेवक पदाचे सर्व 29 उमेदवार यांना अधिकाधिक मतांनी विजयी करा, असे आवाहन शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असलं तरी नगरपालिकेत वेगवेगळ्या पक्षांच्या गणितामुळे कामे अडकतात, निधी विलंबतो आणि नागरिक त्रस्त होतात. त्यामुळे ‘विकसित वणी’ हे स्वप्न साकार करायचं असेल तर नगरपालिकेतही भाजपचं प्रशासन असणं आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. भाजप अध्यक्ष, नगरसेवक आणि केंद्र-राज्यातील सरकार असे ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असेल, तर मंजुरींचा वेग वाढेल, निधी सहज उपलब्ध होईल, मोठे विकास प्रकल्प गतीने पुढे जातील आणि शहराचा चेहरा बदलणारा ‘मेगा डेव्हलपमेंट प्लॅन’ मजबूत होईल.



Comments are closed.