विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील बेलोरा फाट्याजवळ आज सकाळी पट्टेदार वाघाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला आणि क्षणातच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी गर्दी केली, तर वन विभाग व शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घात आहे की अपघात याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
आज सोमवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास बेलोरा फाट्याजवळील घुग्घुस–वणी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. सकाळी काही नागरिकांच्या लक्षात येताच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. कुणी व्हिडीओ तर कुणी फोटो काढले. शिरपूर पोलिसांना घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम, शिरपूर पोलिस तसेच करंजी येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र रस्त्याच्या कडेला मृतदेह असल्याने रात्री रस्ता क्रॉस करताना वाघाला वाहनाची धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाघाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे कारण व वय स्पष्ट होणार आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.



Comments are closed.