पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वरझडी येथील माता जगदंबा (महाकाली) मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम लंपास केली. ही घटना रविवारी, दिनांक 21 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. मात्र या चोरीचा अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील आरोपी गावातीलच निघाला आहे. यासह दुस-या घटनेत एका मोटर सायकल चोरट्याला गजाआड केले. त्याच्याकडून 7 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कारवाई शिरपूर पोलिासांनी केली.
प्राप्त माहिती नुसार, तालुक्यातील वरझडी येथिल माता जगदंबा मंदिरातील पुजारी निवासी सेवा करतात. रविवारी कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मंदिररात रात्री कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. दुसऱ्या दिवशी पुजारी मंदिरात आले असता त्यांना दानपेटी फोडलेली आढळली. त्यांनी ही माहिती मंदिर समितीच्या सचिवांना दिली. त्यानुसार शिरपूर पोलिस ठाण्यात या बाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती.
शिरपूर पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव दिनेश उदंरू निकुरे (वय 30), रा. वरझडी, ता. वणी, जि. यवतमाळ असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत शिरपूर पोलिसांनी कुख्यात सराईत गुन्हेगार शेख आशिक उर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय 35), रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ याच्याकडून चोरीच्या 7 मोटारसायकली जप्त केल्या. त्यात 5 हिरो होंडा स्प्लेंडर, 1 हिरो होंडा पॅशन प्रो आणि 1 बजाज पल्सर 220 सीसी अशा विविध कंपनींच्या दुचाकींचा समावेश आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मनवर (ठाणेदार) व त्यांच्या पथकातील इक्बाल शेख, अजय वाभिटकर, सुरज साबळे, अविनाश बानकर, रंजना सोयाम, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, दीपक वाकडे, किरण दासरवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



Comments are closed.