कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघालेली मुलगी बेपत्ता
एका तरुणावर संशय, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी एका तरुणाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची आई ही कुटुंबीयांसह वणीत राहते. ती मजुरी करते. तर त्यांची मुलगी ही वणीतील एका शाळेत 11 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती नेहमीप्रमाणे 9 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास “मी कॉलेजला जात आहे” असे सांगून घरातून निघून गेली.
संध्याकाळी मुलीची आई कामाहून घरी आली. मात्र तिला तिची मुलगी घरी दिसली नाही. तिची उशिरा पर्यंत वाट पाहिली मात्र तरी ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही.
तरुणाने पळवून नेल्याचा संशय
एक वर्षापूर्वी तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्याच्यासोबत पीडित मुलगी वारंवार बोलत असायची. याबाबत मुलाला समजही देण्यात आली होती. याच तरुणाने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Comments are closed.