वणी पोलीस स्टेशनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बहुगुणी डेस्क, वणी: पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या वाढत्या कामाच्या ताणात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वणी पोलीस स्टेशनच्या ‘दक्षता हॉल’मध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेल लाईफ केअर हेल्थ सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), वणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कर्तव्य बजावताना पोलीस दलातील घटक स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नयेत आणि वेळीच आजारांचे निदान व्हावे, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे यात केवळ अधिकारी व अंमलदारच नव्हे, तर वणी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही मोफत तपासणी करण्यात आली.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नाडी परीक्षण, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी तसेच सामान्य आरोग्य सल्ला देण्यात आला. या तपासण्यांमुळे पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
याप्रसंगी SDPO यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलीस दल दिवस-रात्र जनसेवेसाठी तत्पर असतो. अशा वेळी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त पोलीस कुटुंबीयांनी घ्यावा.”
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सकाळपासूनच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून तपासणी करून घेतली. या उपक्रमामुळे पोलीस दलात आरोग्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.



Comments are closed.