जेव्हा नाकाबंदी करून पोलीसच आवळतात ‘पोलिसां’च्या मुसक्या !

मारहाण, पाठलाग आणि खंडणी ! घडली थरारक घटना....

बहुगुणी डेस्क, मारेगाव: ‘आम्ही एलसीबी पोलीस आहोत…’ या एका वाक्याने सुरू झालेला हा थरार, काही मिनिटांतच मारहाण, पाठलाग आणि खंडणीपर्यंत पोहोचला. मारेगाव तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अवघ्या एका तासात मारेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत या तीन तोतया पोलिसांना गजाआड केले. बुधवारी दिनांक, 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास लाखापुर येथील वनोजादेवी मंदिर बसस्टॉपजवळ ही घटना घडली. 

शेती व्यवसाय करणारे मंगेश दिलीप मेश्राम (वय 30, रा. लाखापुर) हे मित्रासोबत चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबले असताना, पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन (MH32 AX 6254) हॉटेलसमोर येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या तिघांनी हॉटेलमधील खुर्चीवर पाय पसरून बसत दादागिरी सुरू केली. यावेळी मंगेश मेश्राम यांनी सभ्यतेने खुर्चीवर नीट बसण्याची विनंती केली. मात्र याच क्षणी तिघांनी स्वतःला “आम्ही एलसीबी पोलीस आहोत” अशी खोटी ओळख देत, “तू आम्हाला शिकवतोस का?” असे म्हणत मंगेश यांना थापड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जमिनीवर पाडले.

मारहाणीने घाबरलेले मंगेश थेट घराकडे पळ काढला. मात्र तोतया पोलिसांनी चारचाकी कारने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत लाखापूर येथील मंगेशचे घर गाठले. तेथे त्यांनी मंगेशच्या वडिलांना, “आम्ही पोलीस आहोत, तुमच्या पोरावर गुन्हा दाखल करतो… नाहीतर पैसे देऊन प्रकरण मिटवा,” अशी दमदाटी करत 1,500 रुपयांची खंडणी उकळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तोतया पोलिसांना बेड्या
हा प्रकार बनावटीचा असल्याचे लक्षात येताच मंगेश यांनी तत्काळ मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत मारेगाव पोलिसांनी वणी–मारेगाव मार्गावर सिनेस्टाईल नाकाबंदी करत मार्डी चौकात चारचाकी कारसह तिघांनाही अटक केली. हर्षल रामेश्वर ठाकरे (वय 38), रा. आर्वी नाका, वर्धा, हरीष कैलासराव ठाकरे (वय 34), रा. रामनगर, वर्धा, अनंता अजाबराव धोटे (वय 39), रा. तिरझडा, कळंब (यवतमाळ) असे या तोतया पोलिसांचे नावं आहेत. 

या तिघांविरुद्ध बीएनएस कलम 204, 318, 115(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे, एएसआय दिगंबर किनाके व पो.कॉ. सागर दीपेवार करीत आहेत.

Comments are closed.