बहुगुणी डेस्क, वणी: घुग्घुस मार्गावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावर लहान भावाने मोठ्या भावासमोरच नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. बुधवारी दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महेश दशरथ देठे (वय अंदाजे 34, रा. नायगाव बु.) असे मृत युवकाचे नाव आहे.
महेश हा आई व मोठ्या भावासोबत नायगाव (बु.) येथे राहत होता. मागील काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने तो अधिक चिंतेत होता. महेश हा पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीच्या घुग्घुस कॅम्पमध्ये मिस्त्री काम करत होता.
बुधवारी सकाळी महेश आपल्या मोठ्या भावासह व एका मित्रासोबत घुग्घुसकडे निघाला. वर्धा नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर भावाने त्याच्या वागण्यात बदल जाणवल्याने समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक महेशने पुलावरून नदीत उडी घेतली. मोठ्या भावाने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेशचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.





Comments are closed.