शेताच्या वादातून नातेवाईकात वाद…. कु-हाडीने हल्ला; तरुण जखमी

शेतात काम करताना तरुणावर प्राणघातक हल्ला; बेसा येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये वाद झाला. वणी तालुक्यातील बेसा येथे ही घडली असून, एकाने पुतण्यावर कु-हाडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मनिष प्रमोद जाभुळकर (वय 20) हे बेसा ता. वणी येथील रहिवासी आहे. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे मोठे बाबा शंकर अण्णाजी जाभुळकर (वय 51) यांचे शेत मनिषच्या शेतालगत आहे. मात्र शेतीतून त्यांच्यात वाद आहेत. यापूर्वीही शेतीच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले आहेत.

दि. 11 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास मनिष आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता, त्याचे मोठे बाबा शंकर यांचे बैल मनिषला त्याच्या शेतात चरत असल्याचे दिसले. बैल हाकलण्यावरून वाद निर्माण झाला. याच रागातून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत कॉलर पकडली व हातातील कु-हाडीच्या मुंडीने डोक्यावर वार केला. या हल्ल्यात मनिषच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर आरोपीने मनिषला ढकलून दिल्याने ते ताराच्या कुंपणावर पडले. यामुळे त्यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली व हातातून रक्त निघाले. यावेळी आरोपीने “पुन्हा काही बोललास तर एखाद्या दिवशी जिवाने मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर जखमी मनिष घरी गेला व सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी त्याला वणी पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 118(1), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.