आज तहसिलसह वणीतील सर्व शासकीय कार्यालय बंद
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शोक
बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खद प्रसंगी राज्य शासनाच्या अधिन येणारी सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मंत्रालयासह राज्यातील संपूर्ण शासकीय कार्यालये (राज्य सरकार) बंद राहणार असून शासनाने तीन दिवसांचा राज्यशोक जाहीर केला आहे. कार्यालय केवळ आजच बंद राहणार आहे.
मंत्रालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा राज्य शोक जाहीर केला आहे. 28 ते 30 जानेवारी या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येणार आहे. या काळात कोणतेही अधिकृत शासकीय मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत. तसेच आज दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बारामती विमानतळावर सकाळी साडेआठच्या सुमारास लँडिंगदरम्यान खासगी चार्टर विमानाला तांत्रिक अडचणी आल्या. विमान रनवेवरून घसरल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जागीच मृत्यू झाला. विमानात एकूण पाच जण होते. इतर प्रवाशांचाही मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजित पवार हे बारामतीतील नियोजित राजकीय कार्यक्रमासाठी जात होते.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही घटना राज्यासाठी मोठा धक्का ठरली असून संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.





Comments are closed.