पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत श्री सदगुरु गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ताल-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली. ही शोभायात्रा श्री रंगनाथ स्वामी मंदिर येथून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री जैताई माता मंदिर येथे समारोप करण्यात आली. शोभायात्रेत पदावली भजन, सजवलेली बग्गी, भगवे ध्वज आणि गजानन महाराजांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले.
महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ‘गण गण गणात बोते’च्या गजरात भक्तांनी नृत्य करत महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. अशोक सोनटक्के यांनी साकारलेली संत गजानन महाराजांची वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. या भव्य आयोजनाचे मुख्य आयोजक श्री संत गजानन महाराज सेवा समिती, वणी होते. समितीच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था उत्तमरीत्या करण्यात आली होती. दिवसभर शहरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.



Comments are closed.