कंपनीच्या करचुकवेविरोधात मोहोर्ली ग्रामस्थांचे आमरण उपोषण
उपोषणाचा तिसरा दिवस: कर आकारणीत लाखोंची तफावत, ग्रामस्थ आक्रमक
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली गावात कार्यरत असलेल्या वैभव स्पिनटेक्स प्रा. लि. (सूतगिरणी) या कंपनीविरोधात करचुकवेगिरी व परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप होत असून, त्याच्या विरोधात ग्रामपंचायत समिती व ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उद्योगाला ग्रामपंचायतीची कोणतीही बांधकाम किंवा उद्योग परवानगी नसताना बांधकाम सुरु असून यातून लाखो रुपयांच्या महसुलाला ग्रामपंचायतीला मुकावे लागल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारीपासून ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आंदोलना विविध राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवीला आहे.
ग्रामपंचायत मोहोर्लीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, सन 2024 मध्ये कंपनीकडून तब्बल ₹32,36,524 इतकी कररक्कम वसूल करण्यात आली. मात्र, पंचायत समिती वणीमार्फत करण्यात आलेल्या फेरमोजणीत कररक्कम फक्त ₹9,00,121 इतकी ठरविण्यात आली असून, दोन्ही आकड्यांमध्ये ₹23,36,503 इतका मोठा फरक आढळून आला आहे. या तफावतीमुळे ग्रामपंचायत व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अटी व शर्तीचे उल्लंघन?
वैभव स्पिनटेक्स कंपनीला फक्त 11 अटींचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले होते. या अटींनुसार उद्योग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र परवानगी आवश्यक होती. मात्र आजतागायत कंपनीला ग्रामपंचायतीकडून कोणतीही बांधकाम अथवा उद्योग परवानगी देण्यात आलेली नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. तरीही कंपनीने उद्योग सुरू केला व कर आकारणीही करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजकीय नेत्यांची भेट
शनिवार, 7 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, टिकाराम कोंगरे इत्यादींनी ट दिली, तर सोमवारी दिलीप काकडे यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी येऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

या उद्योगाबाबत गेल्या चार वर्षांपासून उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. कंपनीने ग्रामपंचायतीचे पत्र स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे प्रशासनाशी पत्रव्यवहारही ठप्प झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





Comments are closed.