बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहराच्या दक्षिण व नैऋत्य दिशेला असलेल्या रंगनाथ नगर, शास्त्रीनगर व कोंढाणावाडी परिसरात मध्यरात्रीच्या शांत काळोखात अचानक घराच्या टिना व कवेलूच्या छतावर दगडांचा मारा होतो. आवाजाने नागरिक दचकून जागे होतात. बाहेर येऊन पाहतात तर बाहेर कुणीही नसतो. गेल्या 15 दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार या परिसरात सुरु आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीत अद्याप कोणालाही इजा झाली नसली तरी अशा घटना सातत्याने घडत असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
या रहस्यमय दगडफेकीचा सुरुवातीचा प्रकार शास्त्रीनगर भागात रात्री 12 वाजताच्या सुमारास समोर आला होता. पहिले नागरिकांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही; मात्र रंगनाथ नगर व कोंढाणावाडी या भागातही अशीच दगडफेक होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. गेल्या पंधरा दिवसांत अनेक वेळा ही घटना घडली आहे. रंगनाथ नगर, शास्त्रीनगर हा परिसर गरीब वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे बहुतांश घरे टिनाची व कवेलूची आहेत. जागेअभावी काही लोक घरासमोरील अंगणात किंवा शेडमध्येही झोपतात. अशा स्थितीत अचानक दगडफेक झाल्यास ईजा होण्याचा धोकाही नाकारता येत नाही.
पोलिसांची व नागरिकांची रात्री गस्त
सतत होणाऱ्या दगडफेकीबाबत नागरिकांनी वणी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस विभागाने या भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. काही नागरिकांनीही स्वतःहून रात्री जागून गस्त सुरू केली आहे. मात्र अद्याप दगडफेक करणारा समाजकंटक हाती लागलेला नाही.
ही दगडफेक कोण करत आहे? आणि यामागचा नेमका उद्देश काय? याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. कुणी टवाळखोरांचा प्रकार असल्याचे म्हणत आहे, तर कुणी मुद्दाम दहशत निर्माण करण्याचा संशय व्यक्त करत आहे. पोलीस तपासातून लवकरच या रहस्याचा उलगडा होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.





Comments are closed.