अडेगाव येथील आंदोलनाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिली भेट
बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या दशकभरापासून कॉर्पोरेट दडपशाही आणि प्रदूषणाचा विळखा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अखेर अंत झाला आहे. झरी तालुक्यातील ईशान मिनरल्स अडेगाव या कंपनीच्या मनमानी आणि अन्यायकारक धोरणांविरोधात 10 फेब्रुवारी 2026 पासून शेतकऱ्यांनी ‘मरण आले तरी चालेल, पण हक्क मिळवणारच’ या निर्धाराने आमरण उपोषणाचे रणशिंग फुंकले आहे. या आंदोलना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे.
गेल्या 11 ते 12 वर्षांपासून शेतकरी नवनाथ महादेव क्षीरसागर यांच्या शेतीचे कंपनीमुळे अतोनात नुकसान होत असून वारंवार विनंत्या करूनही कंपनी व्यवस्थापनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट मागण्या केल्या आहेत. क्षीरसागर यांना मागील 12 वर्षांच्या नुकसानीपोटी 3 लाख 30 हजार रुपये आणि यंदापासून दरवर्षी 60 हजार रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बफर झोनमधील अवैध उत्खणन तातडीने थांबवून उत्खणन केलेला भाग पूर्ववत भरावा, डी-वॉटरिंगमुळे परिसरातील बोअरवेल कोरडे पडत असल्याने 80 फुटाखालील डी-वॉटरिंग थांबवावी, तसेच अडेगाव ते खडकी रस्त्यावर कंपनीच्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून तीन वेळा पाणी फवारणी करावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
शेतक-यांच्या जमिनी गेल्या, पाणी गेले आणि आता धूळ खाऊन मरायची वेळ आली आहे. जोपर्यंत ईशान मिनरल्स स्थानिकांना न्याय देत नाही. तोपर्यंत आम्ही या आंदोलनाचा पाठपुरावा करून त्यांच्या सोबत राहिल असा इशारा अंकुश बोढे यांनी दिला.






Comments are closed.