विवेक तोटेवार, वणी: उकणी कोळसा खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा गायब, त्याऐवजी माती-गिट्टीमिश्रित निकृष्ट माल रेल्वे साइडिंगवर पोहोचला. या गंभीर प्रकरणी तीन दिवसांनंतर वणी पोलिसांनी केवळ दोन ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेदरम्यान ही हेराफेरी झाल्याचे समोर आले आहे. कोलारपिपरी सब-एरियाचे उपक्षेत्रीय प्रबंधक युसूफ एम. हुसेन यांच्या वतीने रेल्वे साइडिंग इन्चार्ज देवेंद्र प्रतापसिंग परिहार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी ट्रक चालक सैफ अली व विश्वनाथ यांच्याविरुद्ध बीएनएस कलम 316 (3), 318 (2), 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या काळ्या धंद्यात आणखी कोणाचे हात काळे झाले आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

काय आहे प्रकरण?
22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उकणी कोळसा खाणीतून मे. कृष्णा इन्फ्रा कंपनीचे दोन ट्रक (क्र. CG 11 BM 9033 आणि CG 11 BM 3214) उच्च प्रतीचा कोळसा घेऊन रेल्वे साईडिंगकडे रवाना झाले. मात्र साईडिंगवर पोहोचण्यापूर्वीच हे ट्रक यवतमाळ रोडवरील रामदेवबाबा मंदिराजवळील एका खासगी कोळसा प्लॉटवर थांबले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तेथे ट्रकमधील मूळ उच्च दर्जाचा कोळसा उतरवून त्याऐवजी कोळसा वॉशरीजवळील दुसऱ्या प्लॉटवरून ‘बेडिंग मटेरियल’ आणि मातीमिश्रित निकृष्ट कोळसा भरून ट्रक रेल्वे साईडिंगवर नेण्यात आल्याची चर्चा आहे. साईडिंग व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघड झाला.
‘अर्थपूर्ण’ पाठबळाची चर्चा
वणी पोलिसांनी ट्रक चालक सैफ अली आणि विश्वनाथ यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 316 (3), 318 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. वणी परिसरात कोळसा चोरी आणि तस्करी हा दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. ट्रकमधून कोळसा लंपास करून त्याऐवजी मातीमिश्रित माल भरण्यासाठी एक संगठित रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर व्यवहारांना संबंधित विभागांचे ‘अर्थपूर्ण’ पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत मोठ्या माशांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत कोळसा चोरीचे सत्र थांबणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
या प्रकरणात केवळ ट्रक चालकांवर कारवाई करून मूळ सूत्रधारांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर असून अनेक ‘बडे मासे’ यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पोलिस तपास किती निष्पक्ष आणि व्यापक होतो, याकडे संपूर्ण वणीकरांचे लक्ष लागले आहे.



Comments are closed.