भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी धीरज भोयर यांची निवड
वणीतील युवा सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्याची दखल; युवक नेतृत्वाला संधी
बहुगुणी डेस्क, वणी: युवा सामाजिक कार्यकर्ते धीरज भोयर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी जाहीर केली. वणी परिसरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या धीरज भोयर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीत धीरज भोयर यांना काँग्रेसने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी निवडणूक काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता.

धीरज भोयर हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी युवकांना संघटित करण्याचे कार्य केले आहे. नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी मदतकार्य केले. याशिवाय दारूबंदी आंदोलन, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, बेरोजगार मेळावे, कोरोना काळातील मदतकार्य तसेच शिक्षण व सामाजिक जनजागृती कार्यक्रम अशा विविध उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
“सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाला पक्षाने दिलेली ही मोठी संधी आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. पक्ष संघटन मजबूत करणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि जनसामान्यांच्या हितासाठी काम करणे हेच माझे ध्येय राहील.” – धीरज भोयर

या निवडीबद्दल त्यांनी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण तसेच वणी विधानसभेचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे आभार मानले. तसेच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. धीरज भोयर यांच्या या निवडीबद्दल वणी परिसरातील भाजप व भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



Comments are closed.