नांदेपेरा रोडवर तोतया पोलिसांची भरदिवसा किमया

चेकिंगचे कारण सांगत वृद्धाला ठगवले, सोन्याची अंगठी लंपास

बहुगुणी डेस्क, वणी:  दुपारची वेळ होती. एक वृद्ध शेतकरी वणीहून नांदेपे-या जवळ असलेल्या त्यांच्या शेतात जात होते. दरम्यान त्यांना दोन पोलीस त्यांची दुचाकी थांबवतात. पुढे सोनं लुटणारी टोळी असून त्याचा आम्ही तपास करीत आहो, असे पोलिसांनी सांगितले. मात्र काही क्षणातच या दोन पोलिसांनी वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास केली. विशेष म्हणजे नंतर ते पोलीस देखील तोतये असल्याचे त्या वृद्धाला कळले. शुक्रवारी नांदेपेरा रोडवर भरदिवसा ही घटना घडली. या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शंकर मारोती चव्हाणकर (वय 70, रा. रविनगर, वणी) यांचे नांदेपेरा परिसरात शेत आहे. शुक्रवारी दुपारी ते त्यांच्या ऍक्टिव्हा मोपेडने शेताकडे जात असताना नांदेपेरा रोडवर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस आहोत, पुढे सोनं लुटणारी टोळी सक्रिय असून त्याचा तपास सुरू आहे, असे सांगत त्यांनी चव्हाणकर यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर तपासाच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्या हातातील सुमारे 10 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 40 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. काही क्षणांतच हातचलाखी करत त्यांनी सोन्याच्या अंगठीऐवजी दुसऱ्या धातूची बनावट अंगठी असलेली पुडी चव्हाणकर यांच्या हातात दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. चव्हाणकर शेतात पोहोचल्यावर त्यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्याची अंगठी नसून पितळ सदृश धातूची अंगठी असल्याचे लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. फसवणूक झालेले शंकर चव्हाणकर हे माजी नगरसेवक नितीन चव्हाणकर यांचे वडील आहे. 

Comments are closed.