भोंदू अशोक खरात प्रकरणात राजकीय संगनमताचा संशय
SIT किंवा न्यायालयीन चौकशी करा; माकपचा जनआंदोलनाचा इशारा
बहुगुणी डेस्क, वणी: भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यवतमाळ जिल्हा कमिटीने भोंदू अशोक खरात प्रकरणात सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यात प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशोक खरात या तथाकथित बाबाने नाशिक येथे राज्यभरातील हजारो लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडलेली ही घटना एका व्यक्तीकडून शक्य नसून त्यामागे सत्ताधारी, राजकीय नेते आणि प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे माकपने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी SIT किंवा न्यायालयीन देखरेखीखाली करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता जप्त करून सरकारच्या ताब्यात घ्यावी, असेही निवेदनात नमूद आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय नेता, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती सहभागी असल्यास त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित नागरिकांना तात्काळ न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अशा घटनांना आळा घालण्याची गरज माकपने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचेही नमूद करण्यात आले असून, तपासात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माकपने दिला आहे. देशात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्तीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांना केवळ सामाजिक नव्हे, तर व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक असल्याचे माकपने स्पष्ट केले. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्यासाठी निर्णायक लढा उभारण्याची गरज असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, जिल्हा सचिव कॉ. देविदास मोहकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व प्रगतिशील, धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.


Comments are closed.