दारू का पाजली? अजब वादातून एकाला बेदम मारहाण

आधी नशेत मारली कानाखाली, नंतर भावांनी केली परतफेड

बहुगुणी डेस्क, वणी: गावातील एक तरुणाने दुस-याला दारू पाजली. त्याबाबत गावातील एकाने दारू का पाजली अशी विचारणा केली. त्यावरून वाद झाला. वादात तरुणाने विचारणा करणा-याच्या कानाखाली लावली. मात्र नंतर झापड मारणा-यांचे भाऊ आले व त्यांनी झापड मारणा-या तरुणाला बेदम मारहाण केली. एका आरोपीने हातातील कड्याने डोक्यावर जोरदार वार करून जखमी केले. तालुक्यातील मुर्धोनी या गावात ही घटना घडली असून  या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी अमित राजु दुबे (28) हा मुर्धोनी येथील रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. सोमवारी दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता तो गावात उभा होता. यावेळी तो मद्याच्या नशेत होता. त्यावेळी गावातील संदीप कालेकर व प्रशील पोटे हे अमित जवळ आले व त्यांनी पुंडलीक याला दारू का पाजली? अशी विचारणा केली. अमितने तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही मध्ये का पडता असे म्हणाले. यातून वाद वाढला. दरम्यान अमितने प्रशील पोटे याच्या कानाखाली थापड मारली आणि तो तेथून निघून गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री सुमारे 10 वाजता प्रशील पोटेचा भाऊ आरोपी प्रविण नामदेव पोटे (वय अंदाजे 30) हा जगन्नाथ प्रेमानंद पोटे (वय अंदाजे 25) आणि अभिनव कापसे (वय अंदाजे 27) या दोघांना घेऊन अमितकडे आला. त्यांनी “तू आमच्या भावाला का मारले?” असा प्रश्न विचारला आणि वाद सुरू केला. त्यानंतर तिघांनी अमित यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. जगन्नाथ प्रेमानंद पोटे याने हातातील कड्याने अमित यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात अमित यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. मारहाणीत ते खाली पडले आणि त्यांच्या डाव्या पायाला खरचटले.

वाद चालू असताना अमित यांचा चुलत भाऊ महेश मध्ये आला. त्याने अमितला आरोपींच्या तावडीतून सोडवले. आरोपींनी शिवीगाळ करून “पुन्हा आमच्याशी भांडशील तर जिवे मारून टाकू” अशी धमकी देत तेथून पळून गेले. असे तक्रारीत म्हटले आहे. अमित दुबे यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी प्रविण नामदेव पोटे, जगन्नाथ प्रेमानंद पोटे आणि अभिनव कापसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 3(5) आणि 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.