बहुगुणी डेस्क, वणी: मच्छी तलावातून जाळी चोरी केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील खंडणी परिसरात उघडकीस आली. गुरुवारी 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपींनी तब्बल 35 हजार रुपयांची जाळी चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी गोविंद पवन रॉय (वय 55) हे मुळचे चंद्रपूर येथील असून त्यांनी खंडणी येथील मच्छी तलाव ग्रामपंचायतीकडून 20 जून 2023 ते 20 जून 2026 या कालावधीसाठी कराराने घेतला आहे. ते आठवड्यातून काही दिवस तलावाजवळील झोपडीत राहतात, तर उर्वरित काळ कुटुंबासह चंद्रपूर येथे असतात. तलावाच्या देखरेखीकरिता चौकीदारही नियुक्त करण्यात आला आहे. चौकीदार तलावाशेजारी 24 तास हजर असतो.
दि. 2 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास आरोपी सुनिल पोतु आत्राम (40), ज्ञानेश्वर हरिभाऊ टेकाम (35), आशीष भीमराव टेकाम (25) आणि वसंत भवानी आत्राम (49) (सर्व रा. खंडणी, ता. मारेगाव) हे तलावाजवळ आले. त्यांनी तेथे ठेवलेली मच्छी पकडण्यासाठीची जाळी चोरून नेली. ही घटना चौकीदार विमल विश्वास यांनी पाहिली. त्यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी जाळी घेऊन पसार झाले.
चौकीदाराने घटनेची माहिती सकाळी रॉय यांना दिली. त्यानंतर त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.