NEWS UPDATE- दरोड्याची बॅग लागली पोलिसांच्या हाती !

ते 3 अज्ञात दरोडेखोर कोण? पैसे सुरक्षीत, आरोपींचा शोध सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: मार्डी रोडवर सोमवारी रात्री थरारक घटना घडली. दुचाकीला लाथ मारून दुचाकीवर ठेवलेल्या बॅगमधल्या 3 लाखांच्या रकमेवर दरोडा टाकण्यात आला होता. मछिंद्रा ते बाम्बर्डा दरम्यान रात्री 9 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी 3 अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र समाधानाची बाब म्हणजे बॅग सापडली आहे. मारेगाव पोलिसांच्या हाती ही बॅग लागली आहे. या बॅगमधले पैसे देखील सुरक्षीत आहे. मात्र निर्जन रस्त्यावर दरोडा टाकणारे ते तिघे कोण? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सध्या आरोपींचा शोध सुरु आहे.

काय आहे घटनाक्रम? 
तक्रारीनुसार, फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर (25) हे मारेगाव तालुक्यातील चोपण येथील रहिवासी आहे. त्यांना जमीन खरेदी करायची होती. त्यामुळे सोमवारी दिनांक 6 एप्रिल रोजी वणी येथे दुचाकीने पैसे उसणे घेण्याकरीता आले होते. त्यांनी पैसे व कागदपत्र एका कापडी बॅगमध्ये ठेवले व सदर बॅग त्यांनी दुचाकीच्या पेट्रोल टंकीवर ठेवली. रात्री 3 लाख रुपये घेऊन  नांदेपेरा-मार्डी मार्गे गावी चोपण येथे परतत होते. रात्री पावने 9 ते 9 वाजताच्या दरम्यान त्याची दुचाकी मछिंद्रा ते बाम्बर्डा येथे असताना त्यांच्या दुचाकीजवळ एक ट्रीपलसीट एक बाईक आली. या बाईकवरील एकाने चेतन यांच्या दुचाकीला लाथ मारली.

लाथ मारल्यानंतर एकाने शिताफिने चेतन यांच्या दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवलेली पैशाची बॅग घेतली. दुचाकीला लाथ मारल्याने चेतन यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली. दरम्यान चोरटे पैशाची बॅग घेऊन मार्डीच्या दिशेने धुमस्टाईल पसार झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशी सापडली बॅग !
या बॅगमध्ये 3 लाख रोकड सह महत्त्वाचे कागदपत्र देखील होते. चेतन यांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलीस घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले. दरम्यान झाडा झुडपात शोध घेतला असता त्यांना बॅग मिळून आली. चेतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते खाली पडल्यानंतर त्यांना बॅग दिसली नाही. त्यामुळे चोरटे क्षणात बॅग घेऊन पळाले असा त्यांचा समज झाला. 

पैसे जरी परत मिळाले असले तरी या मार्गावर वाटमारी किंवा दरोड्यासारखी घटना समोर आल्याने या मार्गावरून प्रवास करणारे चांगलेच दहशतीत आले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल असून दरोड्याचा प्रयत्न करणारे 3 दरोडेखोर कोण? त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आता समाजमनातून येत आहे.   

Comments are closed.