पती, पत्नी और ‘वो’… प्रकरण गेलं पोलीस ठाण्यात !

दुसऱ्या महिलेच्या नादात पत्नीचा छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी:  छोटंसं कुटुंब, दोन मुलं आणि एकत्र चालणारं दुकान. सुरुवातीला सगळं सुरळीत… मात्र हळूहळू दारूच्या सवयीनं वाद वाढले, संशयानं घर पोखरलं आणि अचानक पती पत्नीच्या नात्यात ‘तिसरी’ची एंट्री झाली. प्रेम, विश्वास आणि सहजीवनाच्या जागी शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या… आणि अखेर हा संसार पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारीनुसार, पीडित महिला दीपा (नाव बदललेले, वय 34) ही मूळ यवतमाळ येथील रहिवासी असून तिचे 2010 साली मारेगाव येथील एका 37 वर्षीय व्यक्तीशी लग्न झाले. लग्नानंतर दोघे मिळून दुकान सांभाळत होते. त्यांना दोन मुलेही आहेत. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने दारूच्या नशेत तो पत्नीला त्रास देऊ लागला. मुलांकडे पाहून दीपा सहन करत संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होती.

दरम्यान, घरखर्चासाठी पैसे मागितल्यास पती तिला अपमानास्पद बोलून पैसे देण्यास नकार देत असे. एवढेच नव्हे तर तो आपल्या मुलांनाही नाकारत त्यांना अपमानित करीत असे. पत्नी व मुलांना सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सासऱ्यांच्या निधनानंतर हा छळ आणखी वाढल्याचेही समोर आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पती, पत्नी और ‘वो’… वाद टोकाला
दरम्यान, त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलीसोबत पतीचे संबंध असल्याचा पत्नीला संशय निर्माण झाला. याबाबत विचारणा केल्यावर पतीने दीपाला मारहाण केली. पुढे तो त्या मुलीला घेऊन वेगळे राहू लागला. पत्नीने समजावण्याचा प्रयत्न केला असता, “मला तिच्यासोबत राहायचे आहे, तिच्याशी लग्न करणार आहे. मध्ये आलीस तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पती दुसऱ्या महिलेसोबत राहू लागल्याने दीपा ही दोन मुलांसह माहेरी यवतमाळ येथे आली. काही दिवसांपासून ती तेथेच राहत आहे. 5 एप्रिल रोजी पतीने फोन करून “मुलांच्या परीक्षेसाठी मारेगावला आलीस तर तुला सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या दीपाने अखेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2), 351(3), 352 आणि 85 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Comments are closed.