विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील झोला गावाजवळील पाटाळा पुलाजवळ बुधवारी (दि. 15 एप्रिल) दुपारी सुमारे 12.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील तिघे जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव प्रदीप रमेश ठमके रा. वांजरी व अनिल बाबाराव कुत्तरमारे रा. मानकी आहे, तर जखमी हे मारेगाव येथील असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, वांजरी गावातील प्रदीप रमेश ठमके (वय 31) हे मिस्त्रीकाम व बांधकाम ठेकेदार होते. आज दिनांक 15 एप्रिल रोजी ते आपल्या स्प्लेंडर मोटारसायकल (MH 29 B 0963) त्यांचे सहकारी अनिल बाबाराव कुत्तरमारे यांच्यासह शेंबाळ येथे नातेवाईकांकडे जात होते.
दुपारी सव्वा 12 वाजताच्या दरम्यान झोला गावाजवळील पाटाळा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारने (MH 14 GD 6835) त्यांच्या जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार दोन ते तीन पलट्या खात रस्त्याबाहेर जाऊन शेतात कोसळले.
या भीषण अपघातात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप ठमके हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. टोल प्लाझावरील रुग्णवाहिकेला याची माहिती देण्यात आली. जखमींना वरोरा येथे आणण्यात आले. उपचारादरम्यान काही वेळातच प्रदीप ठमके यांची देखील प्राणज्योत मालवली. तर मृत अनिल यांचा मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला गेला.

कारने तीन ते चार पलटी घेतल्याने कारमधील दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. सदर जखमी हे मारेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.