विवेक तोटेवार, वणी: एका अल्पवयीन गतिमंद युवतीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. चेतन पुरुषोत्तम तुराणकर (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी ओळख होती. पीडिता (17 वर्ष 11 महिने) ही गतिमंद आहे. सोमवारी दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी आरोपीने पीडिताच्या कुटुंबीयांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत तिला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर आजीने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला काही तासांतच अटक केली.
पीडित मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून पुढील तपासणीसाठी तिला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 376 तसेच पोक्सो आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



Comments are closed.