फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त जनजागृती सप्ताह
बंटी तामगाडगे, वणी: जनचेतना समितीच्या वतीने फुले आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त ‘शिक्षण’ या विषयावर जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 11 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहे. दरम्यान विविध ठिकाणी चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘सरकारचे शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातील फसवे धोरण’ या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत आणि अभ्यासक या चर्चासत्र आणि कार्यशाळेद्वारा मार्गदर्शन करणार आहेत. वणीत मंगळवारी विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जनचेतना समितीचे विजय वानखेडे यांनी ही माहिती दिली.
सरकारने ३० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे 25 हजार शाळा बंद करण्याच्या विचारात असून त्याजागी खासगी शाळेकडे सर्वसामान्यांना वळवून ‘कॉन्व्हेंट कल्चर’ आणण्याचा सरकारचा डाव आहे. कॉन्व्हेंटचे शिक्षण महागडे असल्याने गरीब आणि मागास प्रवर्गातील लोकांना हे शिक्षण परवडणारे नाही. शिक्षणापासून वंचित राहिल असे धोरण सरकार सध्या राबवत आहे. असा आरोप जनचेतना समितीने केला आहे.
याशिवाय सर्व शासकिय आणि अनुदानित शाळेत उच्च दर्जाचे आणि सीबीएससी पॅटर्न अभ्यासक्रम राबवावा ही मागणी घेऊन सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी चर्चाचत्र आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना सरकारचे बहुजनाविरोधातील शैक्षणिक धोरण लक्षात येईल. 9 एप्रिल पासून विविध ठिकाणी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून 15 एप्रिलपर्यंत हे चर्चासत्र चालणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दिनांक 11 एप्रिलला साखरा (दरा) येथे सकाळी 10:30 वाजता. तर संध्याकाळी 7 वाजता सोनुर्ली ता. कोरपना जि. चंद्रपूर चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 12 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता अडेगाव ता. झरी येथे तर 13 एप्रिलला मारेगाव येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 एप्रिल सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांसाठी वणीतील जिला परिषद शाळेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 एप्रिलला वणीतील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात समारोपीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.
या चर्चासत्राला ज्येष्ठ विचारवंत प्रभाकर गायकवाड औरंगाबाद, रमेश बिडेकर नागपूर, विजय वानखेडे वणी, प्रा श्रीकांत काळोखे अहमदनगर हे मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती विजय वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महेश लिपटे, संतोष वानखेडे, अरुण दोडके, कैलास बोबडे, मारोती जिवतोडे, ऋषिकांत पेचे, परशुराम आवारी, शेखर व-हाटे, मोहन हरडे, विजय वानखेडे यांच्यासह जनचेतना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.